Article Image
Article Image
Image Credit: NewsLaundry
read

एकोणिसाव्या शतकात प्रकाशित झालेले हे पुस्तक त्या काळात जसे म्हणावे तसे खपले नाही कारण त्या वेळी ज्यांच्यासाठी हे पुस्तक लिहले गेले ते लोक खूप अज्ञानी आणि अशिक्षित होते.

माझ्या मते परिस्थिती आज काही जास्त वेगळी नाही आहे. लोक “सुशिक्षित” तर झाले पण खूप जण अज्ञानी च राहिले. मी बोलतोय आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज जयंती ला त्या महान लोकांची जात आणि आपली जात बगुन, “डॉल्बी” लावून, दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची. आजच्या या फुले, आंबेडकर, शिव भक्तांनी त्यांच्या बद्दल कधी काही वाचलंय कि नाही याच्याबद्दल न बोललेलंच बरं.

The day that reduce a man to slavery takes from him the half of his virtue. - Homer

“गुलामगिरी” हे नाव का?

भारत देशातील जातीवादासारखा पाश्चात्य देशातही वंशवाद आणि गुलामगिरी हेही माणुसकीला लागलेले डाग. पण एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत या गुलामगिरी बद्दल लढा दिला जात होता, त्या लढ्याचा महात्मा जोतिबा फुलेंवर खूप प्रभाव झाला. तसाच एक लढा भारतातही व्हावा अशी फुलेंची इच्छा होती. त्या लढ्याच कौतुक म्हणून फुलेंनी या पुस्तकाला गुलामगिरी असा नाव दिल.

जातीयवाद का?

आज हि जेंव्हा जातीवादाचा विषय निघतो तेंव्हा हिंदू धर्माची (कि स्वतःची ) बदनामी होऊ नये म्हणून लोक “वर्ण” वगैरे वगैरे च्या गोष्टी करतात. हिंदू धर्माच्या ग्रंथांमद्धे जर जातीवाद नव्हता तर तो आला कोठून आणि का?

जर कोणाला आपल्या स्वार्थासाठी जातीयवादाचा वापर करायचा असता तर तो असा हि करता आला असता. पण आपल्याच देशातील थोड्या समाजातील लोकांना वाईट, शूद्र, अस्पृश्य ठरवण्याची काय गरज होती.

आपणच रचलेल्या (किंवा बदल केलेल्या ) धार्मिक ग्रंथांमध्ये स्वतःला उच्छ थानी ठेवणं ठीक असतं हि, पण त्या ग्रंथांमध्ये किंवा त्यात केलेल्या स्वार्थी बदलांमध्ये थोड्या समाजाला अस्पृश्य का ठरवण्यात आलं?

असा विचार मला गुलामगिरी हे पुस्तक वाचायच्या अधी कधी आला नव्हता.

या पुस्तकानुसार ‘जातीयवादाचे जनक’ हे बाहेरून आलेले आर्यन (ईराणी) लोक आणि शूद्र व अतिशूद्र हे मूळचे भारतीय लोक. जेंव्हा ते लोक इथे आले तेंव्हा इथल्या राजांशी त्यांच्या राज्यांच्या खूप लढाया झाला. खूप लढाया, विजय, पराजया अंती त्या लोकांनी इथे आपले नियंत्रण प्रस्थापित केले. या लढायांमध्ये ज्या समाजांनी त्यांना मोठा प्रतिकार केला त्यांचा राग या लोकांच्या मनात राहिला आणि तो त्यांनी आपल्या पद्धतीने पुढे काडला.

काळानंतर शूद्रांस आपल्या इतिहासाची आठवण झाल्यास ते कधीं तरी आपल्या विरुद्ध उभे राहतील या भीती पोटी, त्याना कमकुवत बनवन्यासाठी आणि त्यांना अज्ञानीच ठेवण्यासाठी जातीयवादाचा आणि अस्पृश्यतेचा जन्म झाला.

आपल्या समाजातील असुशिक्षित व कमकुवत लोकांचीही आरामात जगण्याची सोय व्हावी म्हणून पाठ पूजा, दान धर्म अश्या गोष्ठींच्या प्रथा पाडण्यात आल्या आणि त्या एकाच समाजासाठी राखीव ठेवण्यात आल्या.

बळीचं राज्य

पुस्तकातील एक लक्षणीय भाग म्हणजे बळी राजा, म्हसोबा, खंडोबा यांच्या गोष्टी.

“ईडा पीडा टळो आणि बळीच राज्य येवो” ही म्हण तर तुम्ही ऐकली असलाच. मी ही ऐकली होती, पण यामधला बळी म्हणजे शेतकरी असा माझा समज होता. पण या पुस्तकाप्रमाणे बळी नावाचा राजा खरंच होऊन गेला. तो प्रजेसाठी काम करणारा, प्रजेचे रक्षण करणारा असा होता.

वर बोललेल्या युद्धांमध्ये त्या इराणी लोकांची बळी राजाशी झालेल्या युद्धांचाही समावेश आहे.

या बळी राज्याचं राज्य खूप मोठं पसरलेल होत, त्यातील पश्चिमेचा भाग म्हणजे महाराष्ट्र. हा भाग बळी राजाने नऊ खंडांमध्ये विभागला होता.

या महाराष्ट्रामध्ये बळी राजाने महासुभा आणि नऊ खंडांचे न्यायी असे दोन महत्वाचे अधिकारी रचले होते.

या नऊ खंडांच्या अधिकाऱ्याला खंडोबा असे म्हणतं.
त्यांपैकी जेजोरीचा खंडोबा हा एक होता. तो आपल्या भागातील मल्लांच्या खोडी मोडून त्यांस ताळ्यावर आणी म्हणून त्याचे नाव मल्लअरी (मल्हारी) अस पडलें होतें. त्यानें कधीं आपल्या शत्रूंवर पाठीमागून वार केला नाहीं, म्हणून त्याचें नांव मारतोंड (मार्तंड) पडलें होतें.

दुसरा अधिकारी म्हणजे महासुभा, त्याचा अपभ्रंश म्हसोबा झाला आहे. तो शेतकऱ्यांच्या पीकपाण्याची तपासणी करून त्याप्रमाणें सूट तूट घालून सर्वांस आनंदांत ठेवीत असे. यामुळें मऱ्हाठी लोकं आपल्या शिवारांतील एकाद्या दगडास म्हसोबा म्हणून शेंदुराने म्हाखून त्याला पूजतात. आणि त्या म्हसोबाला निवद, ऊद दाखवूनच शेताचे काम हाती घेतात.

बळीच्या सर्व महावीरांपैकीं भैरोबाजोतीबा व नऊ खंडोबा हे रयतेच्या सुखाकरितां झटण्याची शर्थ करीत असत.

म्हणूनच महाराष्ट्रात ग्रामीत भागांमध्ये खंडोबा, जोतिबा, म्हसोबा व भैरोबा असे देव सापडतात. त्यांना लोकांनीच देव केले; किमान हे देव लोकांमध्ये जातीवरून भेद तरी करत नाहीत.

बळीराजा जेव्हां कांहीं महत्त्वाचें काम आपल्या सरदारानां सोपवी, तेव्हां आपला दरबार भरवून तेथे तो एका तबकात भंडारा, नारळ व पानाचा विडा मांडून म्हणत असे की, ज्याला हे काम करण्याची हिम्मत असेल त्याने हा विडा उचलावा.

ज्या महावीराला ते काम घ्यायचे असेल तो शपथ घेऊन त्यांतील भंडारा कपाळी लावून नारळासहित तो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरांत घेई. यावरून त्या संस्काराचें नाव तळी उचलणे हें पडले असावे.

आणि यासाठीच सर्व मर्‍हाठ्यांत (मर्‍हाठे म्हणजे मांग, महार, कुणबी, आणि माळी इत्यादी लोक) कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वीं तळी उचलण्याची प्रथा पाळली जाते.

या बळी राज्याचा जेंव्हा पराजय झाला तेंव्हा जे लोक त्याच्या विरोधात लढले असे विप्र लोक खुश झाले. म्हणूनच विप्रांच्या कित्येक कुळांत दरवर्षी विजयादशमिला त्यांच्या स्त्रियांनी कणकीचा किंवा तांदुळाचा बळी दाराच्या ऊंबर्‍याबाहेर करून ठेवलेला असतो, त्याचे उरावर डावा पाय देऊन ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट फोडितात; नंतर त्यावर उल्लंघन करून घरांत प्रवेश करतात, अशी वहिवाट पडली.

त्या विरुद्ध बळी राज्याच्या लोकांत दशमीला, स्त्रियां आपल्या उंबर्‍यांत उभ्या राहून पुरुषांना ओंवाळून अशा म्हणतात कीं, “इडा पीडा (द्विजांचा अधिकार) जावो आणि बळीचें राज्य येवो.”

जातीयवाद कसा

शूद्र व अतिशूद्र लोक संख्येने त्या लोकांच्या पेक्षा खूप जास्त आहेत, तरी पण, त्या कमसंखी लोकांनी त्यांच्यावर कसा काय इतका अत्याचार केला असावा?

याचे सोपे उत्तर म्हणजे “अज्ञान”.

एक ज्ञात माणूस कित्तेक अज्ञानी लोकांना भूल थापा ढोकून त्यांचे मन आपल्याकडे वळवून त्यांना आपल्या ताब्यात ठेवू शकतो.

जर ते लोक एकमताचे असतील तर त्यांना ताब्यात ठेवणं कठीण असतं. पण त्या लोकांमधे काही एकमत नसेल तर त्यांना वंचित करणं खूप सोपं होऊन जात. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या जातींमध्ये तोडलं गेलं जेणेकरून त्या लोकांमध्ये कधी एकमत किंवा सामंजस्य होऊ नये. आणि त्यातून ही थोड्या लोकांना “असपृष्य” ठरवून बाकीच्यांना त्यांच्यापासून दूर राहण्यास परावृत्त केले गेले. हे सर्व काही स्वार्थापोटी आणि स्वतःच्या भल्यासाठी.

एकजुटी बरोबर ज्ञान ही तसं त्या लोकांचा शत्रूच. कारण जर ते शूद्र लोक ज्ञानी झाले, तर ते आपल्या विरुद्ध पेटून उठतील या भीती पोटी त्यांना ज्ञानापासून दूर ठेवण्यात आलं. आणि त्यासाठीच ज्ञान हे एकाच जातीसाठी राखीव ठेवण्यात आलं.

पण इतक्या लोकांना फक्त भूल थापांनी आपल्या ताब्यात ठेवणं तसं कठीणच. मग अज्ञानाला भीतीची जोड दिली तर? आणि त्यासाठी धर्मा सारखं अस्त्रच नाही.

माहित नाही धर्मामध्ये, म्हणजे धार्मिक ग्रंथांमध्ये, या भूल थापा आधी पासूनच होत्या की त्यामध्ये बदल करून त्यामध्ये या भूल थापा जोडल्या गेल्या.
काहीही असो याच धार्मिक ग्रंथांचा वापर जातीयवाद टिकून ठेवण्यासाठी आणि लोकांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी केला गेला. अजून हि केला जातो.

ते विष्ठा खाणार्‍या पशूंचा गोमूत्र पिऊन पवित्र होतात; परंतु ते शूद्राचे हातचें स्वच्छ कारंजाचें पाणी पिण्यास अपवित्र मानितात.

इंग्रज लोक आल्यावर परिस्थिती बदलायला हवी होती पण तसं झालं नाही किंवा करू दिल गेलं नाही.

इंग्रज लोक्कांना आपल्या राज्याच्या व्यवस्थापनेसाठी सुशिक्षित, कारकून लोकांची गरज होती, पण शिक्षण एकाच जातीसाठी राखीव असल्यामुळे सरकारी नोकऱ्या जास्त करून त्याच लोकांना मिळाल्या.

जर कोणाला जातीयवादाविरुद्ध किंवा जातीयवादी लोकांच्या विरुद्ध तक्रार करायची असल्यास त्यांना या कारकुनी लोकांच्या माध्यमातून जावे लगे. पण त्या लोकांची एकी असल्यामुळे अशा तक्रारी कधी इंग्रज सरकारपर्यंत पोहूचू दिल्या गेल्या नाही.

तक्रारी पोहोचल्या किंवा इंग्रज लोकांनी परिस्थिती पहिली असली तरी, त्यांना “धर्मामध्ये हस्तक्षेप” न करण्यास परावृत्त करण्यात आले.

वाईट वाटत कि अशाच पद्धतींचा वापर अजूनही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वार्थासाठी केला जातोय.

The most violent element in society is ignorance - Emma Goldman

अस्वीकरण (Disclaimer)

गुलामगिरी हे पुस्तक दोन लोकांतील संवाद या स्वरूपात लिहले असल्याने त्यातील संदेश हे कथांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. वर लिहलेलं ही माझी पुस्तकाची समज असून त्यातील कथा, माहिती आणि संदेश हे लेखकाचे म्हणजे महात्मा जोतीराव फुले यांचे आहेत.

Blog Logo

Nilesh Injulkar


Published

Image

Injulkar Nilesh

Code. Read. Trek.

Back to Overview